घाबरलेल्या तरुणीला पोलिसांनी कुटुंबीयांपर्यंत पोहोचवलं

Rokhthok Maharashtra 9 0

कराड शहरातील कर्तव्यदक्ष पोलिसांच्या सतर्कतेमुळे २९ वर्षीय तरुणी सुखरूपपणे आपल्या कुटुंबीयांच्या ताब्यात पोहोचली आहे. १५ ऑगस्टच्या रात्री साडेनऊच्या सुमारास कराड शहरातील उड्डाणपुलाखाली ही तरुणी घाबरलेल्या अवस्थेत बसलेली आढळली.
नातेवाईकांकडे जाते असं सांगून ती घरातून बाहेर पडली होती. मात्र, उड्डाणपुलाखाली आल्यानंतर तिला पुढे नेमकं कुठे जायचं हे समजत नव्हतं. ती प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती.
याचवेळी कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आशिष पाटील आणि नवनाथ पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आली. दोघांनी तातडीने तिच्याजवळ जाऊन शांतपणे विचारपूस केली.
सुरुवातीला भीतीमुळे तिला स्वतःची ओळखही सांगता येत नव्हती. मात्र, पोलिसांनी संयमाने चौकशी केल्यानंतर ती पाटण तालुक्यातील बहुले गावची असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तिचा भाऊ कराडमध्ये दाखल झाल्यानंतर आवश्यक चौकशी करून पोलिसांनी तरुणीला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं.
या कामगिरीबद्दल DYSP राजश्री पाटील आणि PI दत्तात्रय दराडे यांनी पोलीस कर्मचारी आशिष पाटील आणि नवनाथ पाटील यांचं कौतुक केलं आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.