पुण्यात धाडसी चोरी! भिंत फोडून आराध्या ज्वेलर्समधून २५-३० तोळे सोने लंपास

Rokhthok Maharashtra 43 0

पुण्यातील मांजरी परिसरात एका सराफा दुकानात धाडसी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी (मुंढवा रोड) येथील आराध्या ज्वेलर्स या दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानाच्या पाठीमागील भिंतीला मोठे भगदाड पाडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर लॉकर आणि दागिन्यांचे कपाट फोडून २५ ते ३० तोळे सोने तसेच मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने चोरी करून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गुन्हे शाखा, श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपास सुरू असून, परिसरातील तसेच दुकानातील CCTV फुटेजची तपासणी केली जात आहे.
चोरीस गेलेल्या मालाचे नेमके वजन आणि किंमत याची पडताळणी सुरू असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.