येरवडा जेलमधून जन्मठेपेचा कैदी फरार! “जेवून येतो” म्हणाला अन् गायब झाला

Rokhthok Maharashtra 12 0

पुण्यातील येरवडा केंद्रीय कारागृह मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी कारागृहातून फरार झाला आहे.
संतोष लक्ष्मण भिंगारे, मूळचा सातारा जिल्ह्यातील पाचवड येथील रहिवासी असून तो येरवडा खुल्या जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. ८ मे रोजी कारागृहाच्या शेती विभागात सिमकार्ड नसलेला एक मोबाईल सापडला होता. या प्रकरणात भिंगारे आणि दुसऱ्या एका कैद्याची चौकशी होणार होती.

मात्र चौकशीपूर्वीच भिंगारेने “सायंकाळचे जेवण करून येतो” असे सांगितले आणि बराकीकडे गेला. पण त्यानंतर तो पुन्हा परतलाच नाही. कारागृह परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही.
या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.