*शाश्वत सौर ऊर्जेच्या वापरात महाराष्ट्र प्रगतीपथावर* – गोपाल काबरा यांचे मत; सौर ऊर्जा प्रसारासाठीच्या ‘सौर संवाद २०२६’ यात्रेचा समारोप
पुणे : “पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे, अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणे आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देणे, ही काळाची गरज आहे. शाश्वत सौर ऊर्जेच्या वापरात महाराष्ट्र प्रगतीपथावर असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार, उद्योजकता आणि आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत,” असे मत ‘जीके एनर्जी’चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गोपाल काबरा यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा वापर वाढल्यास ऊर्जा बचतीबरोबरच स्थानिक पातळीवर कौशल्यविकास आणि स्वयंरोजगारालाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
सौर ऊर्जेचा प्रसार, या क्षेत्रातील व्यावसायिक संधींची माहिती आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सौर संवाद २०२६’ यात्रेचा समारोप रविवारी पुण्यातील खराडी येथील मेफील्ड इस्टेटमध्ये झाला. १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान यात्रेद्वारे महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये सौर ऊर्जेविषयी संवाद साधण्यात आला. अहिल्यानगर येथून सुरु झालेली ही यात्रा संभाजीनगर, नाशिक, धुळे, बुलढाणा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, वाशीम, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूरमार्गे फिरून पुण्यात यात्रेचा समारोप झाला.
गोपाल काबरा म्हणाले, “सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि स्थानिक व्यावसायिकांपर्यंत या तंत्रज्ञानाची माहिती पोहोचविणे आवश्यक आहे. सौर ऊर्जा हा केवळ वीज निर्मितीचा पर्याय नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सौर ऊर्जेचा स्वीकार वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती आणि तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यात्रेद्वारे सौर ऊर्जेच्या वापराचे फायदे तसेच या क्षेत्रातील व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.”
“येत्या काळात एक हजारांहून अधिक उद्योजकांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असून, घरगुती छतावरील (रुफटॉप) सौर यंत्रणा, व्यावसायिक सौर प्रकल्प, सौर कृषिपंप, ऊर्जा साठवण, यंत्रणा बसविणे, देखभाल आणि वितरण अशा विविध क्षेत्रांतील संधींची माहिती देण्यात आली. तसेच विक्री, सेवा आणि तांत्रिक कामांसाठी स्थानिक पातळीवर व्यवसाय कसा सुरू करता येईल, याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन केले,” असे काबरा यांनी यावेळी सांगितले.





