शिवनेरी ते वढू बुद्रुक ‘शिव-शंभू कॉरिडॉर’ला गती; खासदार अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश.
पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला ते स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असलेल्या वढु बुद्रुक दरम्यान ‘शिव-शंभू कॉरिडॉर’ विकसित करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सार्वजनिक बांधकाम विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रकल्प विभागाने तयार केलेला याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यासाठी अधीक्षक अभियंता, पुणे मंडळ यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनस्थळे आहेत. ही सर्व ठिकाणे जोडणारा १० मीटर रूंदीचा ‘शिव-शंभू कॉरिडॉर’ विकसित करण्याच्या मागणीचा पाठपुरावा खासदार डॉ. कोल्हे गेल्या ३-४ वर्षांपासून करीत होते. महामार्गाची लांबी वगळता सुमारे ६०.०० कि.मी. लांबीचा रस्ता १० मीटरने विकसित केल्यास शिवनेरीसह जुन्नर तालुक्यातील किल्ले व पर्यटन स्थळे, ओझर, लेण्याद्रि येथील अष्टविनायक गणपती मंदिर, लेणी समूह, त्याचबरोबर वाफगावचा ऐतिहासिक होळकरवाडा, पेशवेकालीन टाकसाळ, कनेरसरचे यमाई देवस्थान आणि वढु-तुळापूरचे छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असा पर्यटनाला चालना देणारा ‘कॉरिडॉर’ तयार होईल, अशी भूमिका मांडत खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
खासदार डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘शिव-शंभू कॉरिडॉर’चा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाने रु. ३९० कोटी रकमेचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, पुणे मंडळ यांच्याकडे सादर करण्यात आला असून त्यांच्या मान्यतेनंतर मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, पुणे यांच्यामार्फत राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, सर्वप्रथम पर्यटनाला चालना देणारा हा ‘शिव-शंभू कॉरिडॉर’चा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याबद्दल राज्य शासनाचे मनापासून आभार. ‘शिव-शंभू कॉरिडॉर’मुळे पर्यटनाला चालना मिळणार असून त्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर पर्यटन मार्गदर्शक (टूर गाईड) या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अनेक तरुणांना या व्यवसायात संधी निर्माण होतील. त्याचप्रमाणे निवास व्यवस्था, हॉटेल्स, स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ आदी व्यवसायाला चांगले दिवस येतील. स्थानिक उत्पादनांनाही पर्यटकांमुळे बाजारपेठ मिळेल, ही या ‘शिव-शंभू कॉरिडॉर’ मागची संकल्पना आहे. त्यामुळे प्रस्ताव तयार होणं ही पहिली पायरी असून राज्य शासनाची मंजुरी मिळेपर्यंत या प्रकल्पाचा प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.



