“खोट्या तक्रारींनी आयुष्य उद्ध्वस्त” ; मांजरीतील तरुणीची पोलीस आयुक्तांकडे आर्त हाक

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यातील मांजरी बुद्रुक परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच संवेदनशील घटना समोर आली आहे. सततच्या खोट्या तक्रारी, पोलीस चौकशा आणि मानसिक त्रासामुळे एका तरुणीने थेट पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी केली आहे.
सिमरन मोहन चव्हाण या तरुणीने दिलेल्या निवेदनानुसार, २०१८ मध्ये त्यांचे कुटुंब मांजरी बुद्रुक येथील घरकुलमध्ये राहायला आले. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या राधिका पोपट चव्हाण आणि विजया पोपट चव्हाण यांनी सतत खोटे आरोप आणि तक्रारी करून संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DYRksp7uGVA/

सिमरनच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला किरकोळ वादातून पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या. मात्र त्यानंतर सतत मारहाण, शिवीगाळ आणि अगदी अॅट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, काही कुटुंबीय वेगळ्या ठिकाणी राहत असूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात कुटुंबातील काही महिलांना अटक झाली, काहींना जेलमध्येही जावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. “आम्हाला सतत पोलीस चौकीत बोलावले जाते, मानसिक छळ केला जातो आणि जगणं असह्य झालं आहे,” असे सिमरनने आपल्या पत्रात म्हटले आहे.

 

तसेच, “जर माझ्यासोबत काही अनुचित घडलं, तर त्याला संबंधित व्यक्ती जबाबदार असतील,” असा गंभीर इशाराही तिने दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे मांजरी परिसरात खळबळ उडाली असून आता पोलीस प्रशासन यामध्ये नेमकी काय भूमिका घेणार? खोट्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी होणार का? आणि या कुटुंबाला न्याय मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Hashtags

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.