जालन्यात ‘कुरुप’ सिनेमासारखा थरार! स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी मित्राचा खून केल्याचा आरोप.

Rokhthok Maharashtra 1 0

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि थरारक गुन्हा समोर आला आहे. दुलकर सलमानच्या ‘कुरुप’ सिनेमातील कथेसारखाच प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गवळी या तरुणाने कर्जातून मुक्त होण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. विमा पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी त्याने आपल्या मित्राचा, संदीप चव्हाण याचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
यानंतर अपघाताचा बनाव करण्यासाठी संदीपचा मृतदेह कारमध्ये ठेवून कारला आग लावण्यात आली. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते. मात्र पोलिसांनी सखोल तपास करताच धक्कादायक सत्य समोर आले.
पोलिसांनी संशयित नितीन गवळी याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी नितीन गवळीसह अमित फुलारे आणि आकाश गवळी यांना अटक करण्यात आली आहे. कर्ज आणि विम्याच्या पैशांच्या लालसेपोटी मित्राचाच जीव घेतल्याच्या या घटनेमुळे जालना जिल्हा हादरला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.