दुबईत २४ कॅरेट सोन्याचा वॉकवे! पर्यटकांना मिळणार सोन्याच्या रस्त्यावर चालण्याचा अनुभव
दुबई आता पर्यटकांना चक्क सोन्याच्या रस्त्यावरून चालण्याचा अनुभव देणार! २४ कॅरेट सोन्याचा वॉकवे तयार केला जाणार असून, हा जगातील पहिला आणि सर्वात लांब गोल्ड वॉकवे ठरण्याचा दावा करण्यात आला आहे.
दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये २०२६ च्या अखेरपर्यंत हा अनोखा वॉकवे पर्यटकांसाठी खुला करण्याची योजना आहे. या प्रकल्पामुळे दुबईच्या पर्यटनाला नवं आकर्षण मिळणार असून, सोन्याच्या व्यापारातील दुबईचं जागतिक स्थान आणखी मजबूत करण्याचा उद्देश आहे.
विशेष म्हणजे, दुबईमध्ये सोन्याच्या दागिन्यांबाबतही नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. जॉयअलुक्कासने तयार केलेल्या पारंपरिक भारतीय झुमक्यांच्या जोडीने सर्वात वजनदार आणि सर्वात मोठ्या सोन्याच्या झुमक्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवल्याची माहिती आहे.
दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये एक हजाराहून अधिक दुकाने असून, सोनं, दागिने, परफ्युम आणि विविध लक्झरी वस्तूंची बाजारपेठ येथे उपलब्ध आहे.
आता २४ कॅरेट सोन्याचा हा वॉकवे पर्यटकांसाठी नेमका कधी खुला होतो, याकडे जगभरातील पर्यटकांचं लक्ष लागलं आहे!





