पुण्यात मित्रांच्या वादातून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू! गळा दाबून हत्या केल्याचा आरोप

Rokhthok Maharashtra 17 0

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांमधील किरकोळ वादातून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मालवली गावातील राजतोरण शाळेच्या मैदानाजवळ काही युवकांमध्ये वाद झाला होता. उपस्थितांनी मध्यस्थी करत वाद मिटवला आणि सर्वजण निघून गेले. मात्र काही वेळानंतर पुन्हा वाद उफाळून आला.
शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात एका 15 वर्षीय मुलाने विकास सुरेश जाधव या 18 वर्षीय युवकाचा गळा दाबल्याचा आरोप आहे.
घटनास्थळी उपस्थितांनी दोघांना वेगळे केले. मात्र त्यानंतर विकास बोलत नव्हता आणि पाणीही पीत नव्हता. त्यामुळे त्याला तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले असून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.