“पुरुष आयोग स्थापन करा; वाढत्या आत्महत्यांना आळा घाला” – अक्षय चव्हाण यांची सरकारकडे मागणी

Rokhthok Maharashtra 14 0

: राज्यात वाढत्या पुरुष आत्महत्या, कौटुंबिक व मानसिक छळाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात स्वतंत्र “पुरुष आयोग” स्थापन करण्यात यावा, अशी जोरदार मागणी रयत विद्यार्थी विचार मंचाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशासह महाराष्ट्रात पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण अत्यंत चिंताजनक बनले असून अनेक पुरुष मानसिक, सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक तणावामुळे टोकाची पावले उचलत आहेत. कौटुंबिक व वैवाहिक वादांमध्ये अनेकदा पुरुषांची बाजू ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना समाजात वाढत आहे.

महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांच्या समस्या, हक्क व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच खोट्या तक्रारी, कौटुंबिक छळ, वैवाहिक वाद, मानसिक नैराश्य आणि आत्महत्येच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात जिल्हास्तरावर पुरुषांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र सुरू करणे, हेल्पलाईन व समुपदेशन केंद्र स्थापन करणे, खोट्या प्रकरणांची जलद चौकशी करणे, पोलिस व प्रशासनाला लिंगनिरपेक्ष प्रशिक्षण देणे तसेच “पीडिताला लिंग नसते” या तत्त्वावर आधारित मदत व संरक्षण व्यवस्था उभी करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

पुरुषांच्या मानसिक आरोग्य, सामाजिक सुरक्षितता आणि न्याय हक्कांबाबत जनजागृती मोहीम राबवून पुरुषांनाही न्याय मिळावा व वाढत्या आत्महत्या थांबाव्यात, यासाठी शासनाने पुरुष आयोग स्थापनेचा गंभीरपणे विचार करावा, अशी अपेक्षा अक्षय चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. 

 

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.