“राज्यातील एकल व परित्यक्ता महिलांचे सर्वेक्षण व्हावे”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Rokhthok Maharashtra 1 0

मुंबई, दि. ४ मे २०२५ : अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जन्मस्थळी मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. त्यामध्ये राज्यातील एकल आणि परित्यक्ता महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करण्याची मागणी केली आहे. आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठल लंघे यांनीही डॉ. गोऱ्हे यांच्यासह याबाबत मागणी केली आहे.

या निवेदनात डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, सध्या राज्यात विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता व अन्य प्रकारे एकल राहणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. काही जिल्ह्यांत या महिलांची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचलेली असून, संपूर्ण राज्यात ती ७० ते ८० लाखांहून अधिक असण्याची शक्यता आहे. शेतकरी आत्महत्या, कोरोनामुळे झालेल्या मृत्यू, व्यसनाधीनता यांसारख्या सामाजिक कारणांमुळे महिलांच्या एकटेपणात वाढ झाली असून, त्यामुळे त्यांच्या सामाजिक व आर्थिक पुनर्वसनाची गरज अधिक तीव्र झाली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे उदाहरण पुढे करत सांगितले की, त्या स्वतः एकल असूनही अत्यंत प्रभावी नेत्या ठरल्या. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन राज्य शासनाने एकल महिलांसाठी धोरणात्मक उपक्रम राबवावेत. या सर्वेक्षणासाठी ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि शहरी भागातील स्वयंसेवी संस्थांचा उपयोग करून हे कार्य कमी खर्चात व प्रभावीपणे राबवता येईल, असेही त्यांनी सुचवले.

या मागणीला राज्यातील विविध सामाजिक संस्थांचा मोठा पाठिंबा लाभला आहे. दुष्काळ निवारण मंच, कार्ड-जालना, स्त्री आधार केंद्र पुणें व लातूर, जनविकास सामाजिक संस्था केज, जि. बीड, अभिनव भारत सोलापूर, साकव पेण प्रकल्प रायगड आदी संस्थांनी या उपक्रमाची गरज अधोरेखित केली आहे. तसेच आमदार अमोल खताळ (संगमनेर) आणि आमदार विठ्ठल लंघे (नेवासा) सदरील निवेदन उद्या मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना देणार आहेत.

“राज्य सरकारने या दिशेने पहिलं पाऊल उचलून सर्वेक्षण हाती घ्यावं आणि एकल महिलांसाठी ठोस कृती कार्यक्रम आखावा,” असे ठाम मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.