मुंबई

“महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये – राज ठाकरे

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात आणि विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांसोबतच कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन कमी-अधिक प्रमाणात विस्कळीत झालं आहे. रायगडमध्ये दरड कोसळण्याच्या दोन घटनांमध्ये ३६ जणांचे प्राण गेले आहेत. तर इतर घटनांमध्ये देखील झालेल्या जीवितहानीमुळे एकूण मृतांचा आकडा ४४वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना खुलं आवाहन केलं आहे. “महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये”, असा संदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांसाठी दिला आहे.

राज ठाकरे म्हणतात..

राज ठाकरेंनी आपल्या ट्वीटर हँडलवरून हा संदेश प्रसारित केला आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. ह्या अवघड परिस्थितीमध्ये मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल, तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, असं आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर जसजसा पूर ओसरेल, तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोहोचेल असं पाहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी”, असा संदेश राज ठाकरेंनी या जाहीर पत्रात दिला आहे.

“महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये. जय महाराष्ट्र!” असं या पत्राच्या शेवटी त्यांनी नमदू केलं आहे.

रायगडमध्ये ३६ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, याच भागातील साखर सुतारवाडी येथे देखील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तळई येथील घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तळई येथे दरड कोसळल्यानंतर याखाली जवळपास ३२ घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x