पुणे

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी चार दिवसीय आधार कार्ड शिबीराचे आयोजन एकही बंदीजन आधार कार्ड शिवाय वंचित राहू नये- उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे

पुणे, दि.६:-

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार समाजातील वंचीत घटकांसाठी येरवडा आधार कार्ड शिबीर आयोजित करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी चार दिवसीय आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एकही बंदीजन आधार कार्ड शिवाय वंचित राहू नये असे उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे सांगितले.
यावेळी कारागृह अधीक्षक यु. टी. पवार, कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त अनुपमा पवार, अतिरिक्त अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी जी. के. भोसले, नितीन क्षीरसागर, सोमनाथ म्हस्के, सुभेदार प्रकाश सातपुते, शिक्षक अंगत गव्हाणे यांच्यासह बंदीजन उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी श्रीमती आखाडे म्हणाल्या, समाजातील एकही वंचित घटक आधार कार्ड पासून वंचित राहू नये यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात येरवडा मध्यवर्ती कारागृहातून करण्यात आली आहे. आधारकार्डचा उपयोग शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून लसीकरणासाठी सुध्दा होत आहे. या आधार कार्ड शिबीरात सहभागी होऊन सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही उपजिल्हाधिकारी श्रीमती आखाडे यांनी केले.