पुणेमहाराष्ट्र

पुणे : हडपसर ते सासवड पालखी मार्गाची फुरसुंगी मध्ये बिकट अवस्था नागरिकांचे अतोनात हाल…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे-पंढरपूर हा मार्ग संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 म्हणून केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासन यांनी घोषित केला आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्यानंतरही या मार्गाची सर्व बाबतीत म्हणजे रस्ता दुरुस्ती असेल, रस्ता रुंदीकरण किंवा चौपदरीकरणाचे काम असेल अशी कामे लवकर होण्याऐवजी त्या रस्त्याची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे.

मार्गांवर जागोजागी खड्डे पडलेले आहेत तसेच बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर चढ-उतार असल्यामुळे खड्डे पडल्यामुळे पाण्याची डबकी साठलेली असतात त्यामुळे तेथे चिखल होऊन रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असल्याने हा नक्की राष्ट्रीय महामार्ग व पालखी सोहळा मार्ग आहे का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांसह वारकरी सांप्रदायाला तसेच वाहनचालकांना पडला आहे .

याबाबत या मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे तसेच अगदी ट्विटरवर देखील या पालखी मार्गाच्या दुरुस्तीबाबत सातत्याने मागणी केली आहे. परंतु, त्यानंतरही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पालखी मार्गावर हडपसर ते सासवड दरम्यान मोठी दुरवस्था झाली आहे.

पालखी सोहळ्यापूर्वी काही ठिकाणी डागडुजीचे काम करण्यात आले होते. परंतु, ते काम खूपच दर्जाहीन असल्याने पावसामुळे खडी, डांबर उखडल्याचे निदर्शनास आले आहे. या मार्गावर पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे.

मेन रोडच्या कडेला साइडपट्ट्या खोदून खड्डे केल्याने वाहतूक सुरळीत होण्याऐवजी चिखल, राडारोडा पसरून मोठमोठे खड्डे तयार होऊन त्यातून डबकी तयार झाली असून रस्ता खड्ड्यात गेला आहे. सध्या, संततधार पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.