पुणेमहाराष्ट्र

विद्युत कायदा व ग्राहक सुरक्षा कायद्याला ला महावितरण विभागाकडून केराची टोपली..!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे.

पुणे : महावितरणचा अजब गजब कारभार कसल्याही नोटीस न देताच केला जातो वीजपुरवठा खंडित. सध्या हडपसर आणि मांजरी भागात महावितरणचे कर्मचारी कधीही, कुठेही येतात व ज्या ग्राहकाने वीजबिल भरले नाही त्याचा विद्युत पुरवठा लगेच खंडित करतात. अशा बऱ्याच ग्राहकांच्या तक्रारी हडपसर व मांजरी या भागातून येत आहेत. आत्तापर्यन्त जेवढ्या तक्रारी आल्या त्यापैकी एकाही ग्राहकाला नोटिस दिलेली नाही. याचा अर्थ महावितरण विभागाचा मनमानी कारभार चालू आहे का? असा सवाल ग्राहकांकडून केला जात आहे. त्यातच सध्या लाईट जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यासाठी जर वायरमेन लोकांना फोन केला तर ते अगोदर विचारतात तुम्ही लाईट बिल भरले आहे का? लाईट बिल भरले असेल तर त्याची झेरॉक्स ऑफिसला दाखवा त्यानंतर आम्ही तुमचा विद्युत पुरवठा चालू करून देऊ असे उत्तर लोकांना मिळत आहे. त्यामुळे विद्युत कायद्याला हडपसर महावितरण कार्यालयाकडून अक्षरशः केराची टोपली दाखवली की काय असा प्रश्न पडतो.

भारतामध्ये तसेच महराष्ट्रात विद्युतीकरण आणि देखभालीची सर्व कामे, भारतीय विद्युत अधिनियम २००३ व भारतीय विद्युत नियम १९५६अन्वये केली जातात. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने नुकत्याच नियंत्रण नियमावली २०१० आणि २०११ या संपूर्ण देशासाठी जारी केल्या आहेत.काही कारणांमुळे बिल न भरल्यामुळे ठराविक मुदतीनंतर वीज कंपनीतर्फे ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित केला जातो.तसे पाहता हा ग्राहकावर अन्याय आहे. वास्तविक विद्युत अधिनियमातील कलम ५६ मधील तरतुदीनुसार, वीज बिलाची रक्कम भरण्याची जी मुदत दिलेली असते, त्या मुदतीपर्यंत ग्राहकाने बिल भरले नाही तर वीज कंपनीने ग्राहकास १५ दिवसांची डिस्कनेक्शन नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यानंतरही ग्राहकाने बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करता येतो. मात्र कुठलीही नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करणे हे बेकायदेशीर असून संबंधित वीज कंपनी न्यायालयीन कारवाईस पात्र ठरते.विद्युत नियमावली व कायद्याविषयी सर्वसामान्य ग्राहकांना फारशी माहिती नसते. त्याचाच गैरफायदा हे विद्युत कर्मचारी घेतात.

महावितरणचे कर्मचारी येतात व ज्या ग्राहकाने बिल भरले नाही त्याचा विद्युत पुरवठा खंडित करतात. परंतु काही कर्मचारी थकीत बिल असणाऱ्या ग्राहकांकडून चिरीमिरी घेऊन विजपुरवठा खंडित न करताच निघून जातात अशी माहिती बऱ्याच दुकानदारांकडून मिळाली आहे.आणि ही बाब अतिशय गंभीर आहे. असा भ्रस्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हडपसर विद्युत विभागाचे अधिकारी काय कारवाई करणार हे पहावें लागणार आहे.