पुणे

विद्यार्थांनी अभिनयातून समाजाला योग्य दिशा द्यावी- डॉ.नितीन घोरपडे

हडपसर (ता.२९) विद्यार्थांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे नुसते जतन न करता समाजाला अभिनयाच्या माध्यमातून जागृत करावे व समाजाला योग्य दिशा द्यावी असे मत अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले. ‘पुरुषोत्तम करंडक’ या सारख्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थांनी सामाजिक विषय घेऊन अभिनय सादरीकरण करावे असे मत प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ना.अजितदादा पवार , यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने अण्णासाहेब मगर महाविद्यालयात एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

एकपात्री प्रयोगात एकच कलाकार रंगमंचावर असतो .कलाकार हा अभिनय, आवाज, हालचाली यातून आपली कला सादर करतो. अशा एकपात्री स्पर्धा नक्कीच मोठ्या संधी निर्माण करतात असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विक्रम जाधव यांनी व्यक्त केले. यावेळेस पु. ल. देशपांडे लिखित बटाट्याची चाळ , असा मी असामी, मधुकर टिल्लू यांचे ‘प्रसंग लहान विनोद महान’ तर प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघाले लंडनला’ यासारख्या अनेक दिग्गज एकपात्री कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला गेला.

सदर स्पर्धेसाठी एकूण 15 स्पर्धक विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मी रमाई बोलते, स्त्रीभ्रूणहत्या, शेतकऱ्याची व्यथा, आई आणि मुलाचे नाते, निळू फुले, ती फुलराणी, मी जिजाऊ बोलतीये, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले एकपात्री प्रयोग सादर केले.
या कार्यक्रमास वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ.शुभांगी औटी , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही एन शिंदे, उपप्राचार्य प्रा.अनिल जगताप , प्रा.कैलास देशमुख , प्रा. भाऊसाहेब भोसले तसेच विविध शाखांचे शाखाप्रमुख उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. संध्याराणी आटोळे, प्रा. वर्षा खळदकर, प्रा. विशाल शिंदे , प्रा.परदेशी एस. पी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संध्याराणी आटोळे तर आभार प्रदर्शन प्रा.वर्षा खळदकर यांनी केले.