पुणेमहाराष्ट्र

भीक मागण्यासाठी चक्क पोटच्या मुलीला 2 हजारांना विकले, पुण्यातील धक्कादायक प्रकार; 15 लोकांवर गुन्हा दाखल…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील येरवडा भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भीक मागण्यासाठी स्वतःच्या 4 वर्षीय मुलीला आई-वडिलांनी केवळ 2 हजार रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तिचा शोध घेतला व तिचा ताबा असलेल्या जोडीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, समाजातील काही तरुणांनी या व्यवहाराला विरोध केला होता. परंतु समाजातील पंचांनी त्यांचे काही एक ऐकले नाही. उलट कोणी विरोध केला व पोलिसांकडे गेला तर त्याला जातीबाहेर काढू असा दम दिला. या सर्व पंचायत सदस्यांची दहशत असल्यामुळे व ते व्याजाने पैसे देत असल्याने घाबरुन सर्व जण गप्प बसले.

याप्रकरणी ऍड. शुभम शंकर लोखंडे (वय 26, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मरीआई देववाले समाजातील 10 पंचासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकिल आहेत. त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना माहिती दिली की, एक महिला गेल्या 2 महिन्यांपासून कल्याणीनगर तसेच विमाननगर भागात 4 ते 5 वर्षाच्या मुलीला घेऊन भीक मागत आहे. भीक मिळाली नाही तर तिला मारहाण करते. त्यांनी अधिक माहिती घेतली असता अहमदनगरमधील एका दाम्पत्याला 6 मुली आहेत. त्यांच्याकडून या तिघांनी समाजातील पंचाच्या सहमतीने 2 हजार रुपयांना विकत घेतली. त्यासाठी जात पंचायतीने पैसे घेतल्याची माहिती मिळाली.

समाजातील 4 जणांनी त्या मुलीला विकण्यास विरोध केला होता. परंतु, समाजातील 10 पंचांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. व त्या मुलीला विकण्यास मान्यता दिली. विरोध करणाऱ्यांना जातीचे बाहेर काढू असा जात पंचायतीने निर्णय दिला. त्यानंतर तक्रारदारांना ही बाब समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन माहिती दिली. पोलिसांनी ही मुलगी विकत घेतलेल्या जोडीला अटक केली आहे. दरम्यान, आपण मुलीला दत्तक घेतल्याचा दावा या मुलीचा ताबा असलेल्या दाम्पत्याने केला आहे.याप्रकरणाचा तपास येरवडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नांगरे करीत आहेत.