पुणेमहाराष्ट्रहडपसर

महापुरुषांचे विचार आचरणात आणावेत : प्रा. प्रदीप कदम

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शूद्रादिकांना शिक्षणाचे दार खुले करून समतेचा, सामाजिक सुधारणांचा पाया रचला. छत्रपती शिवाजी महाराज हे फुले दांपत्याचे आदर्श होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे म.फुले यांना गुरू मानत. अशा अनेक प्रेरणादायी महापुरुषांची महाराष्ट्र भूमी आहे. या महापुरुषांनी आपल्याला पुरोगामी विचार दिला आहे. आपण या महापुरुषांचे विचार आचरणात आणावेत असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा. प्रदीप कदम यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ‘आदर्श महापुरुषांचा’ या विषयावर प्रा. प्रदीप कदम बोलत होते. या व्याख्यानमालेत मारुती करंडे यांनी ‘हसता खेळता माणूस बनुया’, तसेच प्रा. मुबीन तांबोळी यांनी ‘जिंकण्याचा पासवर्ड’ या विषयावर व्याख्यान झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बहि:शाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले.

बहि:शाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा बाहेरील अनुभव, ज्ञान मिळते. त्यामुळे विद्यार्थी बहुश्रुत होतात. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सर्वांना शिक्षण उपलब्ध झाले. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. अशोक ससाणे, प्रा.शकील तांबोळी, प्रा.नलिनी म्हेत्रे, प्रा. राजेश देशमुख, प्रा. शिवचरण परदेशी, प्रा. स्नेहल वाघमारे, प्रा. लता जराड, प्रा. धर्मेंद्र जगताप, प्रा. संजय कामटे, प्रा. दिलीप देशमुख, डॉ. वंदना सोनवले, प्रा. अश्विनी घोगरे, सामाजिक कार्यकर्ते माऊली नवले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी घोगरे यांनी केले तर आभार डॉ. अशोक ससाणे यांनी मानले.