पुणेमहाराष्ट्र

ससूनमधील कार्यक्रमात पोलिसाला झालेल्या मारहाणप्रकरणी फडणवीस आमदार कांबळेवर कारवाई करणार का?खासदार सुप्रिया सुळे…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलीसाला केलेल्या मारहाणीच्या घटनेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त करून सदरील घटना गंभीर असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आमदारावर कारवाई करावी असेआवाहन केले आहे.ससून रुग्णालयातील कार्यक्रमामध्ये भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाला केलेल्या मारहाणीचा सर्वच स्तरातून निषेध केला जातो आहे. आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी कारवाईचे आवाहन केले आहे.अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असलेल्या कार्यक्रमामध्ये भाजप आमदार कांबळे यांनी केलेल्या दादागिरीबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी मत मांडले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुणेकरांना त्यांच्या संस्कृतीचा, भाषेचा तसेच सगळ्या गोष्टींचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक शहराची वेगळी संस्कृती व ओळख असते. ससून हॉस्पिटलच्या कार्यक्रमात सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीने पोलिसांना जी वागणूक दिली ते एका बेजबाबदार व्यक्तीलाही शोभत नाही.

हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.आमदार कांबळे यांनी खाकी वर्दीचा आपमान केला आहे. पोलिसांसह दुसऱ्या पक्षातील माणसाला मारणं देखील चुकीचं आहे. राज्यातल्या पोलीस दलाचा मला अभिमान आहे” असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. तसेच खासदार सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील या प्रकरणाबद्दल आवाहन केले. त्या म्हणाल्या, “पुण्यात जी घटना घडली त्यांचा मी निषेध करते. भाजपसोबत आमचे मतभेद आहेत. मनभेद नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी समोर येऊन बोलायला हवं होतं की माझ्या पोलिसांवर कोणी हात उचलला तरी मी सहन करणार नाही.”

पुढे त्या म्हणाल्या, “मिर्जापुर आणि पुण्यात काय फरक आहे, या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहिणार आहे. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेता तर तुमच्या पक्षाला अगोदर ती संस्कृती शिकवा. आपण अशा घटना का सहन करायच्या” असा सवालही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस खात्याचा अपमान झाला आहे.आणि त्याच खात्याचे देवेंद्र फडणवीस हे प्रमुख म्हणजे ग्रहमंत्री आहेत. त्यामुळे हा त्यांचाही अपमान आहे.असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.