मुंबई

डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार २९ जानेवारीला कणेरी मठ येथे अधिवेशन

मुंबई,दि. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथील सिध्दगिरी मठ येथे २९ जानेवारी रोजी होत आहे.अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी येथे दिली.

 

उपमुख्यमंत्री अजितदादा यांची प्रकट मुलाखत मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलाकार घेणार असून त्या कलावंताचे नाव लवकरच जाहीर केले जाईल. राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेवून त्यांना निमंत्रण दिले.या शिष्टमंडळात मुंबईचे अध्यक्ष संजय भैरे व ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले यांचा समावेश होता.उपमुख्यमंत्री पवार यांनी निमंत्रण स्वीकारले व प्रकट मुलाखतीसही अनुमती दिली आहे. कोल्हापूर येथील सिध्दगिरी कणेरी मठ येथे होत असलेल्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष तसेच “मित्र”या शासन अंगिकृत उपक्रमाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर आहेत.संघटनेचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन सातारा जिल्ह्यात जागतिक किर्तीचे पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर येथे पार पडले होते.

फोटो ओळ- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या कोल्हापूर येथील सिध्दगिरी मठ येथे असलेल्या दुसऱ्या अधिवेशनाचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने.सोबत मुंबई अध्यक्ष संजय भैरे व ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले.