पुणे

“दौंड शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार राहुल कुल यांच्याकडे मांडले गाऱ्हाणे.. “हवेली तालुक्यासाठी मार्केट इतरांना प्रवेश नाही – संचालकाकडून खोतीदारांना धमकीचा अजब प्रकार..

पुणे (प्रतिनिधी – स्वप्नील अप्पा कदम)

मांजरी उपबाजारात खोतीदार व्यापाऱ्यांना मज्जाव केल्याने दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतातील लाखो रुपयांचा माल काढण्यावाचून पडून आहे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता संचालक मंडळांने खोतीदारांना मांजरी उपबाजारात परवानगी द्यावी अशी मागणी दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार ऍड.राहुल कुल यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे, संचालक मंडळाच्या निर्णयाविरोधात तीन तालुक्यातील शेतकरी आता आक्रोश करू लागले आहेत.
दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार ऍड.राहुल कुल यांची भेट घेतली, या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले गेल्या तीन महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने खोतीदार व्यापाऱ्यांना मांजरी उपबाजारात मज्जाव केल्याने खोतीदारांनी शेतकऱ्यांचा माल काढणे बंद केले आहे, शेतातील माल काढणे, ट्रान्सपोर्ट व मार्केटला भाजीपाला विक्री करण्याची यंत्रणा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे खोतीदारांकडे ही सर्व व्यवस्था असून शेताच्या बांधावरच खोतीदार शेतकऱ्यांना मालाचा योग्य मोबदला देत आहेत त्यामुळे संचालक मंडळाने खोतीदारांना मांजरी उपबाजारात पुन्हा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदारांकडे केली. या शिष्टमंडळात शेतकरी प्रदीप मेमाणे, महादेव मगर, किरण मगर, तेजस मगर, दिगंबर मगर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

आमदार ऍड. राहुल कुल यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ माझ्याकडे आले आहे लवकरात लवकर खोतीदारांचा प्रश्न मिटवा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान होत आहे असे आमदार कुल यांनी सांगितले, यावर संचालक मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापन काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

संचालकाने खोतीदारांना धमकी देण्याचा भयानक प्रकार…
खोतीदारांचा व्यवसाय बंद पडल्याने उपासमारीच्या मार्गावर असताना थेऊर फाट्यावर सोलापूर महामार्गावरील एक संचालक खोतीदारांना भेटले तुम्ही माझ्या अंगावर शेतकरी सोडता, खोट्या बातम्या लावता शेतकऱ्यांचा माल काढण्याची यंत्रणा मी लावली आहे, खोतीदारांना मी प्रवेश देणार नाही, पत्रकारांचे पण धंदे बाहेर काढतो, कोण बाळासाहेब भिसे? मी ओळखत नाही तुम्हाला काय करायचे करा मी बाजारात येऊ देणार नाही हे मार्केट हवेली तालुक्यासाठी आहे इतर तालुक्यातील लोकांना प्रवेश नाही असा दमच या संचालकाने भरल्याने संचालकांची मजल कुठल्या पातळीवर गेली आहे हे निदर्शनास येते, जिल्ह्याची कृषी उत्पन्न बाजार समिती असताना तालुक्या – तालुक्यात भेदभाव का असा सवाल आता शेतकरी करत आहेत.

 

संचालक मंडळाच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनेचे आंदोलन…
खोतीदार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल काढणे बंद केल्याने हवेली, दौंड व पुरंदर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत, वारंवार विनंती करून व पालकमंत्री अजित पवार यांनी आदेश देऊनही यावर संचालक मंडळ निर्णय घेत नाही उलट एक संचालक मांजरी उपबाजारात येऊन शेतकरी व खोतीदार व्यापारी यांच्यात वादविवाद होईल असे स्टेटमेंट करत आहे लवकर हा प्रश्न सुटला नाही तर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास कोतवाल यांनी दिला आहे.