पुणेमहाराष्ट्र

कर्तृत्ववान माणसांचे चरित्र वाचून स्वतःचे व्यक्तिमत्त्व निर्माण करा : प्रा. डॉ. पांडुरंग कंद अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ज्ञान विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

कर्तृत्ववान माणसाच्या कर्तृत्वामागे मोठा अंधार असतो या अंधाराला भेदून ही माणसं मोठी झालेली असतात. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थीदशेत रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्र विकली ते भारताचे राष्ट्रपती झाले. अब्राहम लिंकन पोस्टमास्तर होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी गुलामांना स्वातंत्र्य मिळवून दिले. अब्राहम लिंकन यांना वाचनाची विलक्षण आवड होती. अशा परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या कर्तृत्ववान माणसांचे चरित्र वाचून स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण करा. असे प्रतिपादन प्रा. डॉ. पांडुरंग कंद यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा. डॉ. पांडुरंग कंद यांनी गुंफले. त्यांनी अरुण शेवते लिखित ‘हाती ज्यांच्या शून्य होते’ या पुस्तकाचे परिचयात्मक विवेचन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. शुभांगी औटी अध्यक्षस्थानी होत्या.

बहि:शाल शिक्षण मंडळ म्हणजे बिनभिंतीची शाळा असून अभ्यासक्रमाबाहेरील जीवनानुभव विद्यार्थ्यांपर्यंत या माध्यमातून पोहोचवता येतात. असे मत उपप्राचार्य प्रा. डॉ. शुभांगी औटी यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी डॉ अशोक ससाणे,प्रा. नितीन लगड, डॉ. वंदना सोनवले, प्रा.अनिता गाडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नेहा साळुंखे यांनी केले तर आभार डॉ. अश्विनी घोगरे यांनी मानले.