पुणे

अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या तपासासाठी सीबीआय चौकशीची मागणी; सुनेत्रा पवारांसह NCP शिष्टमंडळाची फडणवीस यांच्याकडे भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, तरुण नेता पार्थ पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत सीबीआय चौकशीची अधिकृत मागणी केली.

भेटीनंतर बोलताना सुनील तटकरे म्हणाले,
“अजित दादांच्या अपघाती निधनाबाबत आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे की उद्या केंद्रीय गृह मंत्र्यांकडे राज्य सरकारकडून पत्र पाठवलं जाईल.”

तटकरे पुढे म्हणाले,
“सीबीआयसारखी स्वायत्त यंत्रणा तपास करत असेल तर व्यापक पद्धतीने तपास होऊ शकतो. आवश्यकता भासल्यास बाह्य देशातील तपास यंत्रणांचीही मदत घेतली जाऊ शकते. त्यामुळे या प्रकरणातील सर्व मुद्दे लक्षात घेऊन पारदर्शक आणि जलद निष्कर्ष देशासमोर यावेत, ही आमची भूमिका आहे.”

शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहितीही तटकरे यांनी दिली.