कोण आहेत चिकन लेग पीस मॅन उल्हास कामटे? महिन्याला कमावतात लाखो रुपये!

Rokhthok Maharashtra 6 0

सोशल मीडियावर सध्या एकच नाव जोरदार चर्चेत आहे… ते म्हणजे ‘चिकन लेग पीस मॅन’ उल्हास कामटे! काही दिवसांपूर्वी उल्हास कामटे यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. मात्र, स्वतः उल्हास कामटे यांनी व्हिडिओ पोस्ट करत आपण सुखरूप असल्याचं स्पष्ट केलं आणि मृत्यूच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं सांगितलं. पण सोशल मीडियावर लाखो चाहते असलेले उल्हास कामटे नेमके कोण आहेत? त्यांना एवढी प्रसिद्धी कशी मिळाली? आणि महिन्याला त्यांची कमाई किती आहे? जाणून घेऊया…
उल्हास कामटे हे एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि युट्यूबर आहेत. त्यांची खास ओळख म्हणजे ‘चिकन लेग पीस मॅन’. चिकन आणि मटण खातानाची त्यांची हटके स्टाइल, बोलण्याची खास पद्धत आणि व्हिडिओमधील अंदाज यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले.
2018 मध्ये टिकटॉकवर त्यांनी चिकन लेग पीस खातानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांची खास स्टाइल आणि बोलण्याची पद्धत लोकांना इतकी आवडली की हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत गेले आणि पाहता पाहता ते इंटरनेट सेन्सेशन बनले.
आज उल्हास कामटे यांचे सोशल मीडियावर 2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत त्यांनी घाटकोपरमध्ये ‘चिकन लेग पीस’ नावाचं रेस्टॉरंटही सुरू केलं आहे. याशिवाय त्यांचा जिम व्यवसाय आणि इतर व्यावसायिक उपक्रमही आहेत.
आता त्यांच्या कमाईबद्दल बोलायचं झालं, तर एका रिपोर्टनुसार उल्हास कामटे सोशल मीडियाच्या माध्यमातून महिन्याला तब्बल 3 ते 4 लाख रुपये कमावतात. याशिवाय रेस्टॉरंट, जिम आणि इतर व्यवसायांतूनही त्यांना उत्पन्न मिळतं. मात्र, त्यांच्या एकूण मासिक उत्पन्नाचा अधिकृत आकडा उपलब्ध नाही.
दरम्यान, त्यांच्या मृत्यूची अफवा नेमकी कशी पसरली, यामागे ‘झाड फुंक’ या हॉरर सिनेमाच्या प्रीमियरदरम्यान घडलेली घटना असल्याचं सांगितलं जात आहे.
हा सिनेमा पाहताना भयावह दृश्यामुळे उल्हास घाबरले आणि त्यांना पॅनिक अटॅक आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. त्यांना हार्ट अटॅक नव्हे, तर एंग्झायटी अटॅक आला होता. याच घटनेचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याने त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली.
मात्र, आता स्वतः उल्हास यांनी समोर येत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे ‘चिकन लेग पीस मॅन’ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.