कराडमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कारवर बर्थडे VIDEO व्हायरल; सोशल मीडियावर संताप!

Rokhthok Maharashtra 2 0

ज्या उड्डाणपुलावर चार तरुणांचा अपघाती मृत्यू झाला, त्याच ठिकाणी महिला पोलीस कर्मचाऱ्याचं झोकात बर्थडे सेलिब्रेशन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या सेलिब्रेशनवर टीकेची झोड उठली आहे.
साताऱ्यातील कराड येथील कोल्हापूर नाका-नंदलापूर उड्डाणपुलावर हा प्रकार घडला. ३१ ऑक्टोबरच्या रात्री वाहतूक पोलीस कर्मचारी सोनम पाटील हिने आपल्या नवीन कारसोबत वाढदिवस साजरा केला.
व्हायरल व्हिडिओमध्ये सोनम पाटील कारवर केक कापताना, कारच्या बोनेटवर बसून फोटो काढताना, फुलांचा गुच्छ हातात घेऊन पोझ देताना आणि पायरो गनमधून सोनेरी ठिणग्यांची आतषबाजी करताना दिसत आहे.
मात्र, या सेलिब्रेशनवरून वाद निर्माण झाला आहे. कारण काही दिवसांपूर्वी याच उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला होता, तर दोघे गंभीर जखमी झाले होते.
ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याकडूनच सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे सेलिब्रेशन करणे कितपत योग्य? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोनम पाटीलने आपले इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केल्याचे वृत्त आहे. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.