पुणे महापालिकेत प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे… येत्या २१ एप्रिल रोजी ही निवडणूक पार पडणार असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना १७ एप्रिल रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज सादर करावे लागणार आहेत.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार ही निवडणूक होत असून, अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.
दरम्यान, शहरातील १५ पैकी तब्बल १४ क्षेत्रीय कार्यालयांवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे… तर वानवडी-रामटेकडी या एकाच प्रभागावर काँग्रेसची सत्ता दिसून येत आहे.
नवीन प्रभाग रचनेमुळे राजकीय समीकरणे बदलली असून, याचा फायदा भाजपला झाल्याची चर्चा रंगली आहे.
या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
