नागपूरजवळील बुटीबोरी परिसरात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. पार्टीवरून परत येताना दोन तरुण विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये आर्यन सोनटक्के आणि सक्षम बनसोड यांचा समावेश आहे. दोघेही महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पार्टी आटोपून ते वसतिगृहाकडे परतत होते. मात्र, विद्यापीठापासून काही अंतरावर असलेल्या वळणावर त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटला.
गाडी वेगात असल्याने दोघेही रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पडले आणि दगडावर आदळल्याने गंभीर जखमी झाले. दुर्दैवाने, मदत न मिळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रात्रभर ते जखमी अवस्थेत तिथेच पडून होते. सकाळी स्थानिकांना ते दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
