बेळगावजवळील हातरवाड गावात घरगुती वादाने भीषण रूप धारण केलं आहे. साडी नेसण्याऐवजी गाऊन घातल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीला जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मंजुळा पाटील या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. आरोपी पती कृष्णाजी पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर गेल्या आठ वर्षांपासून मंजुळावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. घटनेच्या दिवशी किरकोळ कारणावरून वाद वाढला आणि रागाच्या भरात आरोपीने हे अमानवीय कृत्य केलं.
मंजुळाच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनी धाव घेत आग विझवली आणि तिचा जीव वाचवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ही घटना पुन्हा एकदा घरगुती हिंसाचाराचा गंभीर चेहरा समोर आणते.
