सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भेंड गावाला नुकताच “आदर्श गाव पुरस्कार” मिळाला… पण या पुरस्कारावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गावातील अनेक वर्षे जुनी असलेली सार्वजनिक तालीम सध्या अत्यंत दुरावस्थेत असल्याचे समोर आले आहे. 21 एप्रिल 2026 रोजी ग्रामस्थांनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये तालमीच्या इमारतीला मोठे भगदाड पडलेले दिसत आहे.
आत झाडे-झुडपे उगवलेली आहेत… तर जमिनीवर दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. ही जागा अनेक वर्षांपासून वापरात नसून सध्या दारू पिण्याचे ठिकाण बनल्याचेही समोर आले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे… आदर्श गाव पुरस्काराच्या निकषांनुसार गावात व्यायामशाळा किंवा तालीम सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात ही तालीम पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“निकष लपवून पुरस्कार मिळवला जात असेल, तर हा शासनाच्या योजनेचा अपमान आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.
या प्रकरणाचा व्हिडिओ पुरावा देखील समोर आला असून, प्रशासन याकडे काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
