पुणे

पुण्यात प्रसिद्ध चहा दुकानात एक्सपायरी बन मस्का विक्री! ग्राहकाला उद्धट उत्तर

पुण्यातील एका प्रसिद्ध चहा दुकानात एक्सपायरी झालेला खाद्यपदार्थ विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
RTI कार्यकर्ते प्रफुल सरडा हे चहा पिण्यासाठी दुकानात गेले होते. त्यांनी घेतलेल्या बन मस्काची एक्सपायरी डेट तपासली असता तो पदार्थ कालबाह्य झाल्याचे आढळून आले.
याबाबत दुकानातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी धक्कादायक उत्तर दिलं.

“एक दिवस एक्सपायर झाला तरी काही होत नाही,” असं सांगत त्यांनी उडवाउडवीची भूमिका घेतली. इतकंच नाही तर “पैसे परत घ्या, आम्हाला अशा ग्राहकांची गरज नाही,” असेही बोलण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर फ्रॅंचायझी मालकाशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी एक्सपायरी माल विकण्यास कोणतीही परवानगी नसल्याचं स्पष्ट करत या प्रकाराची माहिती नसल्याचं सांगितलं.
या घटनेमुळे पुण्यातील खाद्य सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून संबंधित दुकानावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.