लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, म्हणजेच ACB ने, लोहगाव पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात अटक केली आहे.
मनोज मधुकर बस्टे असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांनी तब्बल ८० हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ३९ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात मदत करण्यासाठी आणि भविष्यातही सहकार्य करण्याच्या मोबदल्यात बस्टे यांनी आधी ७० हजारांची मागणी केली होती. मात्र पडताळणीदरम्यान ही रक्कम वाढवून ८० हजार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
३० एप्रिल रोजी ACB कडे तक्रार दाखल झाल्यानंतर, पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली आणि त्यानंतर १ मे रोजी सायंकाळी लोहगाव पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला.
यावेळी तक्रारदाराकडून ८० हजार रुपये स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक बस्टे यांना ACB ने रंगेहात पकडले.
या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस आयुक्त अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ACB च्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
पुण्यात ACB ची मोठी कारवाई! ८० हजारांची लाच घेताना PSI रंगेहात अटकेत
