वयानुसार शरीरासोबतच ऐकण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते. तज्ज्ञांच्या मते, साधारणपणे 60 वर्षांनंतर अनेकांना ‘प्रेसबायक्युसिस’ म्हणजेच श्रवणशक्ती कमी होण्याची समस्या जाणवू लागते.
कानाच्या आतील पेशी वयानुसार कमकुवत होतात, त्यामुळे हळूहळू ऐकण्याची क्षमता घटते. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा सतत मोठ्या आवाजात राहणे यामुळेही हा धोका वाढू शकतो.
याची लक्षणं म्हणजे संभाषण नीट ऐकू न येणं, वारंवार गोष्टी पुन्हा सांगायला सांगणं, किंवा टीव्हीचा आवाज जास्त ठेवावा लागणं.
तज्ज्ञ सांगतात की, एकदा श्रवणशक्ती कमी झाली की ती पूर्णपणे पूर्ववत करता येत नाही. मात्र, वेळेवर तपासणी आणि हिअरिंग एडचा वापर केल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवता येते.
म्हणूनच, अशी लक्षणं दिसताच ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
