पुणे

पुण्यात BSNL कॉपर केबल चोरी रॅकेटचा पर्दाफाश; शहराध्यक्षासह ९ जण अटकेत

पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या बीएसएनएल कॉपर केबल चोरीच्या मोठ्या रॅकेटचा वानवडी पोलिसांनी थरारक पाठलाग करत पर्दाफाश केला आहे.
ड्रेनेज लाईनचे झाकण उघडून भूमिगत कॉपर केबल्स क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढणाऱ्या टोळीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
या कारवाईत तब्बल ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अस्लम सगीर खान, आरिफ कुंदुखाँ खान, शोहेब हारुण खान, सलमान इद्रीस मलिक, नरेश कुमार श्रीशिवचरण, नवी मोहम्मद शान मोहम्मद, अनिस अन्सारी, अफाक अन्सारी आणि प्रवीण दादासाहेब बागुल या नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीवेल कंपनीजवळील आश्रय चहा हॉटेलसमोर मध्यरात्री ही चोरी सुरू होती.
पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि शशिकांत लोंढे यांच्या पथकाने सापळा रचत आरोपींना पकडले.
या कारवाईत ३४ लाख ८० हजारांची कॉपर केबल, क्रेन, आयशर ट्रक, मोपेड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान, अटक आरोपी प्रवीण बागुल हा वंचित बहुजन आघाडीच्या झोपडपट्टी सुरक्षा समितीचा पुणे शहराध्यक्ष असल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फरार आरोपी सरताज हुसेन, अमन, तौफीक, अली मोहम्मद उर्फ लल्लन आणि अनिल देडे यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.