पुणे

“कचरा उचला नाहीतर PMC मध्ये टाकू!” अमोल तुपेंचा इशारा |

पुण्यातील साडे सतरा नळी परिसरातील अमनोरा लगतच्या शिक्षक कॉलनीमध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक त्रस्त झाले असून दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

“तात्काळ या भागातील कचरा उचलण्यात आला नाही, तर शिक्षक कॉलनीतील संपूर्ण कचरा प्रायव्हेट डंपरमध्ये भरून पुणे महानगरपालिकेच्या आवारात आणून टाकला जाईल,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी केली आहे. आता पुणे महानगरपालिका यावर किती लवकर कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.