पुणे

१४,२०० कोटींचा पुणे रिंग रोड प्रकल्प! ट्रॅफिकमधून मिळणार मोठा दिलासा

पुणेकरांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा पुणे रिंग रोड प्रकल्प आता वेगाने पुढे सरकत आहे.
पीएमआरडीएकडून सुमारे १४ हजार २०० कोटी रुपयांचा हा मेगा प्रोजेक्ट उभारला जाणार असून, या रिंग रोडची एकूण लांबी तब्बल ८३ किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे.
या प्रकल्पात ११ बोगदे, १७ मोठे पूल, ९ इंटरचेंज आणि २ रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे हा रस्ता हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी आणि लोहगाव विमानतळाला थेट जोडणार आहे. त्यामुळे भविष्यात पुण्यातील प्रवास अधिक जलद आणि सोयीचा होणार आहे.
सध्या प्रशासनाने आळंदी ते वाघोली या ६.५ किलोमीटरच्या पट्ट्याला प्राधान्य दिलं आहे. कारण नगर रोड आणि वाघोली परिसरातील ट्रॅफिक ही मोठी समस्या बनली आहे.
या भागातील जमीन संपादन प्रक्रिया आता सुरू झाली असून, शेतकऱ्यांना रोख रक्कम किंवा टीडीआर असा पर्याय देण्यात आला आहे.
रिंग रोड प्रकल्पासाठी २०२६-२७ च्या बजेटमध्ये मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
रिंग रोडचं काम पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या चारही बाजूंनी प्रवास करणे अधिक सोपं होणार असून, शहरातील ट्रॅफिकवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची अपेक्षा आहे.