पुणे

हडपसरमध्ये टिपू पठाण टोळीची दहशत! २० लाख खंडणीसाठी तरुणाला बेदम मारहाण

पुण्यातील हडपसर आणि सय्यदनगर परिसरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. कुख्यात डॉन टिपू पठाण आणि त्याच्या टोळीविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ३४ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर जीवे मारण्याची धमकी देत तब्बल २० लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सासवड येथील जमीन जबरदस्तीने नावावर करून देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचंही फिर्यादीने सांगितलं आहे. या प्रकरणी टिपू उर्फ रिजवान सत्तार पठाणसह पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर शेख, राहल गव्हाणे, सूरज हंगारगे आणि इरफान शेख अशी इतर आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.