हडपसर परिसरातील बॉम्बसदृश वस्तू प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. खासगी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये सापडलेल्या संशयास्पद वस्तूप्रकरणी पोलिसांनी अखेर एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
बुधवारी सायंकाळी या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. माहिती मिळताच बॉम्बशोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं. प्राथमिक तपासात या वस्तूमध्ये जिलेटिनच्या कांड्या असल्याचं समोर आलं.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन बीडीडीएस पथकाने या कांड्या सुरक्षित ठिकाणी हलवत निकामी केल्या. त्यामुळे मोठा संभाव्य धोका टळला.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी हा आरोग्य विभागाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने प्रकरण अधिकच संवेदनशील बनलं आहे.
या घटनेमागचा नेमका उद्देश काय होता? आरोपीने जिलेटिनच्या कांड्या कुठून आणल्या? घातपाताचा कट होता का? या सर्व बाबींचा तपास आता पोलीस आणि एटीएस संयुक्तपणे करत आहेत.
या घटनेनंतर हडपसर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
