पुणे

आळंदीत महिलेवर सामूहिक अत्याचार; दिघी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल.

पुण्यातील आळंदी परिसरातून अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका महिलेवर घरात घुसून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिच्या घरात घुसून गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले आणि जबरदस्तीने अत्याचार केला.
तसेच “हे घर आमच्या नावावर कर, नाहीतर तुला सतत त्रास देऊ,” अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. 

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, याआधीही चार ते पाच महिन्यांपूर्वी आरोपींनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनेक आरोपींसह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.