पुणे

“झुरळ” म्हणणाऱ्यांना तरुणांचं उत्तर! सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय “कॉकरोच जनता पार्टी”

देशातील तरुणांच्या बेरोजगारी, महागाई आणि व्यवस्थेविरोधातील नाराजीला आता एक वेगळं नाव मिळालं आहे… “कॉकरोच जनता पार्टी” अर्थात CJP!

ही कोणती अधिकृत राजकीय पार्टी नसून सोशल मीडियावर सुरू झालेली एक व्यंगात्मक आणि डिजिटल चळवळ आहे. या चळवळीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत अभिजीत दीपके. ते मूळचे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादचे रहिवासी असून परदेशातून शिक्षण घेतलेले “बॉस्टन रिटर्न” राजकीय रणनीतिकार आहेत.

या पक्षाचा जन्म एका चर्चित वक्तव्यातून झाला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी “काही बेरोजगार तरुण व्यवस्थेवर झुरळांप्रमाणे हल्ला करतात,” असे विधान केले होते. या वक्तव्याचा निषेध आणि त्यावरील उपरोध म्हणून अभिजीत दीपके यांनी “कॉकरोच जनता पार्टी” ही डिजिटल चळवळ सुरू केली.

आज इंस्टाग्राम आणि एक्स म्हणजेच ट्विटरवर या पक्षाचे लाखो फॉलोअर्स आहेत. कोणतीही अधिकृत नोंदणी नसतानाही अवघ्या काही दिवसांत 20 लाखांहून अधिक तरुण या मोहिमेशी जोडले गेल्याचा दावा केला जातोय.

या पक्षाचा अजेंडा देखील तितकाच वेगळा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. बेरोजगारीपासून मुक्ती, व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात लढा आणि भेदभावाविरोधात आवाज उठवणे, या मागण्यांमुळे ही चळवळ तरुणांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे.

व्यंगातून सुरू झालेली “कॉकरोच जनता पार्टी” आता देशातील असंतुष्ट तरुणांचा डिजिटल आवाज बनताना दिसत आहे. अभिजीत दीपके यांच्या या उपक्रमामुळे सोशल मीडियावर नव्या प्रकारची राजकीय चर्चा रंगली आहे. आता ही चळवळ फक्त इंटरनेटपुरती मर्यादित राहणार की भविष्यात मोठ्या सामाजिक बदल घडतील … हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.