कामावर उशिरा का आलास? विचारल्याने कर्मचाऱ्याचा जीवघेणा हल्ला!
पिंपरी-चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी परिसरात कामाच्या ठिकाणी झालेल्या वादातून एका कर्मचाऱ्याने तरुणाच्या डोक्यात लाकडी फळीने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
ही घटना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास टेल्को रोडवरील सेंच्युरी एन्का लिमिटेड कंपनीत घडली.
तुषार सुरेश कांबळे असे जखमी तरुणाचे नाव आहे. तुषार यांनी सहकारी वसंत गोपीचंद शेलार (वय ५०) याला कामावर उशिरा का आलास, अशी विचारणा केली होती. याचाच राग मनात धरून वसंत शेलार याने तुषार यांच्या डोक्यात लाकडी फळीने वार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तुषार यांचे भाऊ नितीन सुरेश कांबळे (वय ३६) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी वसंत शेलार याला अटक केली आहे.
मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. आरोपी वसंत शेलार यानेही विशाल कांबळे याच्याविरोधात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. विशालने लाकडी स्टुलने मारहाण केल्याचा आरोप त्याने केला आहे.
दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आले असून, एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.





