मावशीकडे राहणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी निघाला जवळचाच नातेवाईक!

Rokhthok Maharashtra 20 0

नात्याला काळिमा फासणारी आणि संतापजनक अशी घटना समोर आली आहे. अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच मावशीच्या नवऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
पीडित मुलगी मूळची झारखंडमधील असून, आई रोजगारासाठी चेन्नईमध्ये राहत असल्याने ती मावशीच्या घरी राहत होती. याचाच फायदा घेत आरोपीने मुलगी एकटी असताना वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर, कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली जात होती.
बुधवारी आरोपीने पुन्हा अत्याचार केल्यानंतर मुलीला गंभीर रक्तस्राव सुरू झाला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच आरोपीने तिला रुग्णालयात दाखल केले आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कुडू बसस्थानकावरून आरोपीला अटक केली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या मावशीनेच आपल्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला असून, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.