बीड जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.
माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट अचानक उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनासाठी आलेले भाविक नदी पार करण्यासाठी बोटीत बसले होते. मात्र बोटीत क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 50 हून अधिक प्रवासी बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. नदीच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर बोटीचा ताबा सुटला आणि ती उलटली.
घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. “अरे कुणी मदत करा रे” अशा आर्त हाका भाविकांनी मारल्या. बोट बुडतानाचा हृदयद्रावक व्हिडिओही समोर आला आहे.
स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू करून अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढले. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोदावरीत बोट उलटली! ‘अरे कुणी मदत करा रे’… बीडमध्ये 2 महिलांचा मृत्यू
