पुणे

घायवळ टोळीचे 2 शार्पशूटर जेरबंद! | वर्षभरापासून फरार आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहिल्यानगर पोलिसांच्या धडक कारवाईत गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या कुख्यात सचिन घायवळ टोळीच्या दोन शार्पशूटरना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित भोळेकर आणि ज्ञानेश्वर तोंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांवरही पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती.
माहितीनुसार, रोहित भोळेकर याच्याविरोधात खर्डा पोलीस ठाण्यात नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला त्याच्या ठिकाणाची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रोहितला ताब्यात घेतले. मात्र त्याच्यासोबत ज्ञानेश्वर तोंडे हाही उपस्थित असल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
चौकशीत दोघेही सचिन घायवळ टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचे आणि मकोका लागल्यापासून वर्षभरापासून फरार असल्याचे उघड झाले.
सध्या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.