“एक कोटी दे, मगच बांधकाम कर! बिल्डरचं अपहरण; महापालिका निवडणूक लढवणारा आरोपी अटकेत”

Rokhthok Maharashtra 30 0

कोल्हापुरात बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरण आणि तब्बल एक कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सराईत गुन्हेगार अजित तिवडे याच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मोरे-मानेनगर येथील बांधकाम व्यावसायिक नीलेश जाधव यांनी सुरू केलेल्या प्रकल्पावर आरोपी फ्लॅट खरेदीच्या बहाण्याने आले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून, “बांधकाम सुरू ठेवायचं असेल तर एक कोटी रुपये द्या,” अशी धमकी देण्यात आली. या दहशतीमुळे जाधव कुटुंबाला तब्बल दोन महिने कोल्हापूर सोडून पुण्यात राहावे लागल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अजित तिवडे हा गंभीर गुन्ह्यांतील संशयित असून त्याच्यावर खून, दरोडा आणि खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाईही झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, याच अजित तिवडेने नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली होती. नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तीवरच खंडणी आणि अपहरणाचे गंभीर आरोप झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण लोंढे करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.