पिंपरीत ५ कोटींच्या खंडणीचा आरोप; बांधकाम व्यावसायिकाला मारहाण!
पिंपरीत बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ईडीच्या कारवाईची भीती दाखवत पैसे देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर व्यावसायिकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
फिर्यादी महेंद्र अगरवाल यांच्या तक्रारीनुसार, २७ जानेवारी रोजी जयहिंद शाळेसमोरील एका कार्यालयात हा प्रकार घडला. आरोपींनी संगनमत करून पाच कोटी रुपयांची मागणी केली, तसेच तीन चेक आणि एक प्रतिज्ञापत्र जबरदस्तीने लिहून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय अॅट्रॉसिटी आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी अमर मुलचंदाणी यांच्यासह सहा ते सात जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.





