हडपसर पोलीस ठाण्यात सामान्य नागरिकांना धमक्या? पोलिसांच्या वागणुकीवर गंभीर आरोप, आयुक्त कारवाई करणार?
हडपसर पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांची अडवणूक? पोलिसांच्या वागणुकीवर नागरिकांचे गंभीर आरोप!
हडपसर पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी जायचे की आणखी मनस्ताप सहन करण्यासाठी? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही दिवसांत हडपसर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत अनेक तक्रारी रोखठोक महाराष्ट्र न्यूजकडे प्राप्त झाल्या आहेत.
त्यातील एका प्रकरणात दोन वर्षांपूर्वी केलेल्या मेसेजवरून आणि अलीकडे इशारा केल्याच्या आरोपावरून एका युवकाविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रकरणी पोलिसांनी या युवकाला चांगली बेदम मारहाण केली होती.
संबंधित युवकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून तो एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे, असा दावा त्याच्या पालकांनी केला आहे. मात्र, त्याला तातडीने पोलीस ठाण्यात हजर करा, अन्यथा कामावरून उचलून आणू, अशा शब्दांत एका कनिष्ठ अधिकाऱ्याने धमकावल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.
इतकेच नव्हे, तर एफआयआरची प्रत मागण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांना ती मुलाच्याच हातात देऊ, तुम्हाला देणार नाही, कोर्टातून घ्या, अशा शब्दांत उत्तर दिल्याचा आरोप आहे.
दुसरीकडे हडपसर परिसरात कोयता गँग, चोऱ्या, अवेध गांजा, आणि अमली पदार्थांच्या विक्रीसारख्या समस्यांवर पोलिसांचा अंकुश नसल्याने अनेक युवकांचे जीवन उध्वस्त होत असल्याची तक्रार नागरिकांची आहे.
मात्र, सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात गेले की त्यांच्याशी आरोपी असल्यासारखी वागणूक का दिली जाते?
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांकडूनच नागरिकांना मानसिक त्रास होत असेल, तर न्याय मागायचा कोणाकडे?
पोलीस आयुक्त अमितेश कुमार या प्रकरणाची दखल घेणार का? संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीची चौकशी करून जबाबदारी निश्चित होणार का?
हडपसर पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत उपस्थित झालेल्या या गंभीर प्रश्नांची उत्तरे आता नागरिकांना हवी आहेत.





