शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला! मंदार किवळेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड उघड

Rokhthok Maharashtra 6 0

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा अचानक झालेला नसून, शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेला पूर्वनियोजित कट असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
या हल्ल्यामागे अक्षय चव्हाण, अमोल चव्हाण आणि ओमकार संतोष ऊर्फ बब्या पवार हे मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
एप्रिल २०२५ मध्ये शुभम चव्हाण याची हत्या झाली होती. या प्रकरणात मंदार किवळे आणि त्याच्या साथीदारांविरोधात आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नुकताच मंदार किवळे जामिनावर कारागृहाबाहेर आला होता. त्यानंतर बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर न्यायालय परिसरात त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, भावाच्या हत्येनंतर अक्षय चव्हाण याने आरोपींचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. तर ओमकार ऊर्फ बब्या पवार हा शुभमचा जवळचा मित्र होता. याच जुन्या वैमनस्यातून हल्ल्याचा कट आखण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
विशेष म्हणजे, हल्ल्यासाठी आधीच शस्त्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रकरणात सहा आरोपी पोलीस कोठडीत असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
आता या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? आर्थिक व्यवहारातून आणखी काही धागेदोरे समोर येतात का? याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.