रोहिणी खडसेंना दुहेरी राजकीय धक्का! महिला प्रदेशाध्यक्षपदही गेलं!

Rokhthok Maharashtra 3 0

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. आधी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीची संधी हुकली आणि आता पक्षातील महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्या हातातून गेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महिला आघाडीच्या नेतृत्वात बदल करत ॲड. अंजली साळवे-विठणकर यांची महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे रोहिणी खडसे यांच्याकडील राज्यस्तरीय संघटनात्मक पदाची जबाबदारी संपुष्टात आली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सलग दहा वर्षांच्या अटीमुळे रोहिणी खडसे यांना उमेदवारी करता आली नव्हती. त्यामुळे सहकार क्षेत्रातील राजकारणातही त्यांना माघार घ्यावी लागली.
आता पक्षातील महत्त्वाचं पदही गेल्याने रोहिणी खडसे यांच्या राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, अंजली साळवे-विठणकर यांच्यासमोर महिला आघाडीची नव्याने बांधणी करण्याचं आव्हान असणार आहे. आता या पदबदलानंतर रोहिणी खडसे यांना पक्षाकडून कोणती नवी जबाबदारी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.