तिरुपती बालाजीला १६० कोटींचं सोनं दान! कोण आहेत वर्धमान जैन?
तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल १६० कोटी रुपयांचं सोनं अर्पण! चेन्नईतील उद्योगपती वर्धमान जैन यांनी भगवान व्यंकटेश्वर यांना तब्बल १२१ किलो सोन्याचे दागिने दान केले आहेत. या शाही दानाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. पण कोण आहेत हे वर्धमान जैन आणि त्यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून?
आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिरात मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत हे दागिने मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. या सोन्यापासून मुकुट, पद्म पादालू, बाजूबंद, कमरपट्टा अशा तब्बल ४५ प्रकारच्या दागिन्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
वर्धमान जैन हे चेन्नईतील प्रसिद्ध उद्योगपती असून, ते Access Healthcare या हेल्थकेअर कंपनीचे संस्थापक आणि व्हाईस चेअरमन आहेत. याशिवाय ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. कांची कामकोटी चिल्ड्रन्स ट्रस्ट हॉस्पिटलचे ते मॅनेजिंग ट्रस्टी आहेत.
विशेष म्हणजे, २०२५ मध्ये त्यांनी Access Healthcare मधील आपली ७० टक्के हिस्सेदारी अमेरिकन कंपनीला विकल्यानंतर २०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने बालाजीला अर्पण करण्याची घोषणा केली होती.
आता १२१ किलो सोन्याच्या या दानामुळे वर्धमान जैन देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.





