मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुरड्यासाठी PMP कर्मचाऱ्यांची धावपळ!
पुण्यात पीएमपी बस कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या दहा वर्षांच्या चिमुरड्यासाठी आणलेले तब्बल २५ हजार रुपयांचे इंजेक्शन नातेवाइकांकडून चुकून बसमध्येच विसरले गेले. मात्र पीएमपी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हे इंजेक्शन अवघ्या ४० मिनिटांत शोधून कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात आले.
पुण्यातील औंध येथील मेडिपॉइंट रुग्णालयात अमित गायकवाड यांच्या दहा वर्षांच्या मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मुलाच्या उपचारांसाठी नातेवाइकांनी लष्कर परिसरातून महागडे इंजेक्शन खरेदी केले होते. आइस पॅकमध्ये ठेवलेले हे इंजेक्शन घेऊन ते पीएमपी बसने औंधला जात होते. मात्र, वेस्टएंड येथे बसमधून उतरताना इंजेक्शनची पिशवी सीटखालीच विसरली.
ही बाब लक्षात येताच रुग्णालयाचे कर्मचारी दीपककुमार सिंग यांनी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी चऱ्होली आगाराचे व्यवस्थापक अल्ताफ सय्यद यांच्याशी संपर्क साधला. तिकिटाच्या आधारे बसचा शोध घेण्यात आला. त्यानंतर शेवाळेवाडी आगाराचे व्यवस्थापक विलास मते यांनी वाहक आणि गॅरेज सुपरवायझरच्या मदतीने शोध घेतला असता इंजेक्शनची पिशवी सीटखाली सापडली.
रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी निगडीकडे जाणाऱ्या बसमधून इंजेक्शन खडकी पोस्ट येथे पोहोचवण्यात आले. अखेर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चिमुरड्याला हे इंजेक्शन देता आले. पीएमपी कर्मचाऱ्यांच्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





